NCP SP Group Jayant Patil News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवार, १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, यावेळी १५ ते २० मंत्र्यांचाच शपथविधी होण्याची शक्यता आहे. यात भाजपाचे आठ ते दहा, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येक चार ते पाच मंत्री असू शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदेसेनेला नेमकी किती आणि कोणती खाती दिली जाणार, याची माहिती घेण्याचा प्रयत्न अजित पवार गटाचे नेते करीत असल्याचे समजते. अजित पवार गटाला अर्थ खाते देण्यास भाजप तयार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींवरून जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
आता भाजपा सांगेल तेच शिंदे-अजितदादांना मान्य करावे लागेल
सत्ता मिळाल्यावर सगळे वाद मिटतात. भाजपा जे सांगेल ते आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मान्य करावे लागेल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदार आणि आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, एवढ्या जाग मिळून त्यांची भूक मिटली नसेल तर भाजपा काहीही करु शकते. आमचे सगळे आमदार आणि खासदार एकसंध आहेत.
दरम्यान, कार्यकर्ते काय भूमिका मांडतात बघू. एक देश एक निवडणूक हे अनेक दिवसांपासून सुरु आहे. लोकसभेला ७ टप्प्यात निवडणूक घेतली. राज्यात मात्र एका टप्प्यात निवडणूक घेतली. त्यांना बहुमत मिळाल आहे, मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार सरकारचा आहे. अधिवेशनाच्या आधी तरी विस्तार करतील ही अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.