“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:00 IST2025-11-05T10:00:04+5:302025-11-05T10:00:04+5:30
NCP SP Group News: स्वच्छ मतदार यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत. दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.

“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
NCP SP Group News: पुढच्या दोन-तीन दिवसांत दुबार मतदारांची यादी जाहीर करा. स्वच्छ यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत. गेल्या सहा महिन्यांत ४८ लाख नवीन मतदारांची भर पडली असून ही आकडेवारी निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभी करते. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आयोगाची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी घोळ केला, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर गंभीर आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की, दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रिया राबवा, अन्यथा जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कोलमडेल, असे रोहित पवार म्हणाले.
आयोगाकडे याची सर्व माहिती असूनही ते कृती करत नाहीत
या दुबार मतदारांमध्ये केवळ मुस्लिमच नाहीत, तर हिंदू आणि उत्तर भारतीय मतदारही आहेत. आम्ही यादी तयार करताना कोणताही भेदभाव केलेला नाही. आयोगाकडे याची सर्व माहिती असूनही ते कृती करत नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत म्हटले की दुबार मतदारांना डबल स्टार करू, पण जर तुम्हाला माहिती आहे की अशी नावे आहेत, तर त्यांची यादी जाहीर का करत नाही, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली.
दरम्यान, रोहित पवार यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख करत म्हणाले की, शेलार हे विभीषण असले तरी त्यांनी सत्याची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, कर्जत जामखेड मतदारसंघात तब्बल १४ हजार दुबार मतदारांचे पुरावे त्यांनी स्वतः दिले आहेत. त्याचबरोबर शिरुर मतदारसंघात ११३३ दुबार मतदार आणि १५७८ मिसिंग नोटिस, तसेच चिंचवड मतदारसंघात तब्बल ५४६६० लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा त्यांनी केला. शेजारच्या मतदारसंघातून लोक आणले गेले, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.