८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:27 IST2025-01-09T20:27:06+5:302025-01-09T20:27:20+5:30
NCP SP Group Jayant Patil News: रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्यात यावी. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी करताच जयंत पाटील आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे.

८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; जयंत पाटलांची योग्य निर्णय घेण्याची वेळ आली?
NCP SP Group Jayant Patil News: २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार वेगळे झाल्यानंतरची लोकसभेची पहिलीच मोठी निवडणूक होती. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह द्विगुणित झाला आणि हाच कित्ता २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गिरवायचा, असे ध्येय ठेवून पक्ष कामाला लागला. परंतु, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच कात्रजचा घाट दाखवला. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून, राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपर्क साधला जात असल्याच्या बातम्याही आल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले, असे समजते.
८ दिवस थांबा, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी सुनावले आहे. पुढच्या दोन दिवसांत प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते दिली त्याचा डेटा द्यावा, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. पक्ष चालवणे काही सोपे काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागते. जोरदार भाषण करून उपयोग नाही. डोके शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचे असते. मी एकटा कितीवेळ काम करायचे? आठ दिवसांचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो. निवडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्या. कुणी काय काम केले, याची सविस्तर माहिती द्या. त्यानंतर प्रदेशाध्यपदावरुन बाजूला होतो. बोलणे सोपे असते, चांगला माणूस मिळणे अवघड असते, या शब्दांत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.
अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवलेय?
जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवल्याचे सांगितले जाते. याबाबत सातत्याने होणाऱ्या चर्चांवर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खुलासा केला. मी कुठेही जाणार नाही, जायचे असते तर यापूर्वीच गेलो असतो, असे पाटील यांनी म्हटल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आळस झटकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, विधानसभेतल्या पराभवानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पदाधिकाऱ्यांच्या संताप उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. मराठा व्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा, अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.