“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:36 IST2025-12-10T18:30:49+5:302025-12-10T18:36:18+5:30
Maharashtra Winter Session 2025: लाडकी बहीण योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडिशन घातल्या जात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
Maharashtra Winter Session 2025: आमचा लाडकी बहीण योजनेला पूर्ण पाठिंबा आहे. आमचा एकनाथ शिंदे यांना देखील पाठिंबा आहे. या योजनेमुळे राज्य सरकाचा फायदा झाला. महायुती परत सत्तेत आली. परंतु, आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा मोठा तोटा आहे. सरकारची स्थिती काही असली, तरी एक नंबर हा एक नंबरच असतो. या एक नंबर व दोन नंबरमुळे एकनाथ शिंदे यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले. लाडकी बहीण योजना आणि ई-केवायसी प्रक्रियेबाबत विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी महायुतीला चिमटे काढले.
लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार जयंत पाटील चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का? ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवाई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडिशन घातल्या जात आहेत. केवायसीसाठी आता १३ कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, असे सांगत जयंत पाटील यांनी या योजनेवरून टीका केली.
ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले
जयंत पाटील म्हणाले की, लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज दोन नंबरवर आला, असे शंभूराज देसाई एका ठिकाणी म्हणाले होते. खरेतर एक नंबरचा माणूस आज इथे नाही म्हणून मंत्री देसाई एक व दोन नंबरबाबत बोलत आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनी सांगितले की, मी काही वेगळे बोललो नाही. मुख्यमंत्री स्वतःच म्हणाले होते की, आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो. त्यावरून मी तसे म्हटले. दोन नंबरवरील माणूस पुन्हा एक नंबरवर येऊ शकतो, असे शंभूराज देसाई म्हणाले.
दरम्यान, मंत्री देसाई यांचे उत्तर ऐकून जयंत पाटील यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा झाला मात्र, ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते मात्र एक नंबरवरून दोन नंबरवर गेले. यावर शंभूराज देसाई उत्तरले की, एकनाथ शिंदे हे कायम दोन नंबरवर राहतील असे काही नाही, पदांची अदलाबदल होत असते.