“कोणतीही भूमिका घेतली तरी आमचा भक्कम पाठिंबा”; जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांचे खुले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:59 IST2025-02-17T17:56:10+5:302025-02-17T17:59:07+5:30

NCP SP Group Jayant Patil News: अनेक मुद्द्यांवरून मविआ नेते महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या गायब होण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.

ncp sp group jayant patil not much seen in politics now party workers said our strong support no matter what decision he takes | “कोणतीही भूमिका घेतली तरी आमचा भक्कम पाठिंबा”; जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांचे खुले समर्थन

“कोणतीही भूमिका घेतली तरी आमचा भक्कम पाठिंबा”; जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांचे खुले समर्थन

NCP SP Group Jayant Patil News: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बीड, परभणी मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात असून, सातत्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली जात आहे. अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, विरोधकांच्या या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे नेते जयंत पाटील गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणारे जयंत पाटील गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पटलावर दिसत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात भर म्हणून जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरींना आमंत्रित केले. यावरून जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 

कोणतीही भूमिका घेतली तरी आमचा भक्कम पाठिंबा

जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी जनसमान्यांत रुजवायला जयंत पाटील यांनी मोठे काम केले आहे. पण ज्यांची पात्रता नाही असे लोकही आज जयंत पाटील यांच्यावर बोलायला लागले आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जयंत पाटील कोणत्याही पक्षात राहोत, त्यांच्यामागे आम्ही असू, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात पक्षाध्यक्ष बदलावा, असा सूर उमटला होता. विधानसभेतील पराभवानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पदाधिकाऱ्यांच्या संताप उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. मराठा व्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा, अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्याचे म्हटले जात आहे. 

 

Web Title: ncp sp group jayant patil not much seen in politics now party workers said our strong support no matter what decision he takes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.