“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:31 IST2025-09-25T20:31:41+5:302025-09-25T20:31:41+5:30
NCP SP Group Jayant Patil News: या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत.

“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी?
NCP SP Group Jayant Patil News: महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. विरोधी पक्षांचे नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानीची पाहणी केली. यातच आता राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे
शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे. माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता, त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली. जयंत पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 25, 2025
या…