“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 22:43 IST2023-12-15T22:42:32+5:302023-12-15T22:43:12+5:30
Rohit Pawar Vs Ajit Pawar: कर्जत MIDCबाबत अजित पवारांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेवर रोहित पवार यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे.

“...तर मात्र शांत बसणार नाही”; कर्जत MIDCवरुन रोहित पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर
Rohit Pawar Vs Ajit Pawar: हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आमनेसामने आले आहेत. राम शिंदे सांगतील, त्यानुसार एमआयडीसीचे काम होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर आता रोहित पवार यांनी थेट अजितदादांना इशारा दिला आहे.
कर्जत जामखेडच्या एमआयडीचा मुद्दा नियमाच्या चौकटीत बसवून सोडवावा लागेल. तिथे तरुण तरुणींना रोजगार कसा मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी जास्त गुंतवणूक कशी होईल, असा महायुतीचा प्रयत्न चालला आहे. याबाबत तेथील आमदार राम शिंदे हे अतिशय बारकाईने प्रयत्नशील आहेत. राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने तो मुद्दा सुटेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर आता याबाबत रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
...तर मात्र शांत बसणार नाही
अजितदादांनी राम शिंदे म्हणतील तसेच करावे, पण एक हजार एकरापेक्षा कमी एमआयडीसी नको हे माझे मत आहे. एमआयडीसी करताना इतर प्रश्न मार्गी लावा ही विनंती आहे. आम्ही जी जागा सूचवली आहे ती फॉरेस्ट आणि इतर गोष्टींपासून दूर आहे. त्या ठिकाणी मोठे उद्योग उभे राहू शकतात, गोडाऊन्स तयार होऊ शकतात. पण त्याठिकाणी जर फक्त गोडाऊन्स उभे राहिले आणि कारखाने दुसरीकडे असतील तर जास्त लोकांना रोजगार देता येणार नाही. अजितदादा याबाबतीत लक्ष घालतील. पण सरकारचा निर्णय जर चुकला तर आम्ही शांत बसणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पण महाराष्ट्रात गुंतवणूक खूप कमी झाली आहे. राज्यात केवळ आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे असा डेटा सांगतो. पुढील आठवड्यात चर्चा नाही झाली तर लोकांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.