भिडेच राष्ट्रवादी चालवतात; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:17 IST2019-02-01T05:16:22+5:302019-02-01T05:17:03+5:30
आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.

भिडेच राष्ट्रवादी चालवतात; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
श्रीरामपूर (जि़ अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी नेते असले तरी त्यांचा पक्ष संभाजी भिडे हेच चालवितात, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.
ख्रिस्ती परिषदेसाठी आंबेडकर हे श्रीरामपूर येथे आले होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नसल्याने जागा वाटप व आघाडीबाबत त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात समांतर सरकार सुरू केले आहे. न्यायालयाच्या निकालापूर्वीच त्यांनी राम मंदिर उभारणीची घोषणा केल्याने ते स्पष्ट होत आहे. हा सर्व प्रकार राज्यघटनेला धरून नाही. एससी, एसटी, ओबीसी यांना नव्या पद्धतीने मनुवादी व्यवस्थेत ते बसवू पाहत आहेत.
जागा वाटपात आम्हाला १२ जागा हव्या आहेत. त्या कोणत्याही द्याव्यात. काँग्रेस नेत्यांना एक आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यातील नेते तो द्यायला तयार नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर आपण एकत्र बसून या आराखड्यावर चर्चा करू. त्यानंतरच जागावाटप निश्चित होईल. ओवेसी व एमआयएम आपल्यासोबतच राहील, असेही ते म्हणाले.