“अजितदादा-एकनाथ शिंदे हे भाजपच्याच तिकिटावर लढतील”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 17:04 IST2023-09-22T17:01:20+5:302023-09-22T17:04:38+5:30
NCP Rohit Pawar: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कोणी कापले हेही त्यांनी सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने दिले.

“अजितदादा-एकनाथ शिंदे हे भाजपच्याच तिकिटावर लढतील”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे भाकित
NCP Rohit Pawar: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट सत्तेत सहभागी झाला आहे, तर दुसरा गट विरोधात आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात सातत्याने संघर्ष, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातही साधारण तसेच चित्र पाहायला मिळते. विरोधक अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही जण भाजपच्याच तिकिटावर लढतील, असे मोठे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने केले आहे.
मीडियाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी याबाबत दावा केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून उपमुख्यमंत्री अजितदादांना अडचणीत आणले जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचे अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवले जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवले जाणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे याचं तिकीट कोणी कापले हे त्यांनीही सांगावे
सन २०१९ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कोणी कापले हे त्यांनीही सांगावे. चंद्रशेखर बावनकुळे हे गोपीचंद पडळकरांची बाजू घेत आहेत. पण त्यांची परिस्थिती काय झाली आणि कोणी केली याचा विचार व्हावा, असा टोला रोहित पवारांनी लगावला. भाजपला कोणताही लोकनेता आवडत नाहीत. पंकजा मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि आता नितीन गडकरी यांच्याबद्दल हेच झाले. मोहिते-पिचड यांच्यासारखेच एकनाथ शिंदे यांचे होणार आणि अजित दादांचेही तेच होत आहे. एकनाथ विधानसभा अध्यक्ष अपात्र ठरवणार नाहीत. पण कोर्टात जाणार आणि ते अपात्र होतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, शरद पवारांनी फोटो टाकलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांना जाणवले की, लोक आपल्या पाठीशी येतील. पण त्यांना आता कळले आहे की, शरद पवार लोकनेते आहेत. त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व नाही. पण त्यांनी कितीही फोटो टाकले तरी काहीच होणार नाही. शरद पवारांच्या पाठीशीच लोक आहेत. आमदारांची कामे करून देताना त्यांना ब्लॅकमेल केले जाते. विकासकामांसाठी निधी हवा आहे का? प्रतिज्ञापत्र दे असे सांगितले जाते. सोप्या भाषेत याला ब्लॅकमेलिंग म्हणतात, असा आरोप रोहित पवार यांनी केला.