पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:32 IST2025-11-06T12:31:42+5:302025-11-06T12:32:31+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
CM Devendra Fadnavis on Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ ५०० भरण्यात आल्याचा आणि हा व्यवहार केवळ २७ दिवसांत पूर्ण झाल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. महार वतनाची जमीन आणि सरकारी नियमांना बगल देऊन हा व्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा आहे. या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आणि या जमीन खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
"या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे. याप्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर आहे. जे सांगायचे ते सांगणार आहे. माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही. जे मुद्दे समोर आलेत ते गंभीर आहेत त्यामुळे त्याची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"उपमुख्यमंत्री अजित पवार अशा प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही. कारण या संदर्भात आमच्या सरकारचे एक मत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल. असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
पार्थ पवारांची प्रतिक्रिया
या आरोपांनंतर पार्थ पवार यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी माध्यमांना फोनवरून बोलताना, आपण कोणतेही चुकीचे काम अथवा घोटाळा केला नसल्याचे म्हटले.