“कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे”; नरहरी झिरवळांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 16:22 IST2023-05-27T16:21:44+5:302023-05-27T16:22:44+5:30
Maharashtra Politics: निकाल नेमका केव्हा लागेल? यावर नरहरी झिरवळ यांनी खोचक शब्दांत भाष्य केले.

“कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे”; नरहरी झिरवळांचे सूचक विधान
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर अद्यापही तर्क-वितर्क केले जात आहेत. यासंदर्भात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र, यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सूचक विधान केले आहे.
राहुल नार्वेकर हे भाजप आमदार असून, ते पक्षांतर करून भाजपत आले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचे वावडे नसेल. राहुल नार्वेकरांकडून न्याय्य निकाल येणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यातच आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर भाष्य करताना सूचक विधान केले आहे.
कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे
मीडियाशी बोलताना झिरवळ म्हणाले की, तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाही. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की, ते तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिले आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.
लवकरात लवकर ही सभागृहातील भाषा
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, एवढेच सांगितले आहे. त्यामुळे हा निकाल नेमका कधी येणार? याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, लवकरात लवकर ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येते. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असते, अशी खोचक प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.