"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:43 IST2025-07-22T13:15:25+5:302025-07-22T13:43:44+5:30

विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे यांचं झालं आहे. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.

NCP MLA Rohit Pawar post New video of Agriculture Minister Manikrao Kokate over Playing Rummy in vidhan sabha | "राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर

"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर

मुंबई - राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. कोकाटे यांचा विधिमंडळातील सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आला आणि राज्यात खळबळ माजली. या व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र मला रमी खेळता येत नाही. मी जाहिरात स्कीप करत होतो असं सांगत कोकाटे यांनी स्वत:चा बचाव केला. त्याशिवाय जर मी दोषी आढळलो तर राजीनामा देईन असं विधान केले. त्यावर आता आमदार रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ ट्विट करून राजीनामा द्यावाच लागेल असं म्हटले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर हा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात माणिकराव कोकाटे रमी खेळत होते तेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू असल्याचा आवाजही ऐकायला मिळत आहे. याबाबत रोहित पवार यांनी म्हटले की, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री कोकाटेंचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

त्याशिवाय विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे यांचं झालं आहे. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आता चौकशी करायचीच तर कृषिमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? अशा शब्दात रोहित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. 

Web Title: NCP MLA Rohit Pawar post New video of Agriculture Minister Manikrao Kokate over Playing Rummy in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.