राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 19:37 IST2023-07-11T19:37:20+5:302023-07-11T19:37:58+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला
अजित पवारांनी राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत बसवून शरद पवारांची साथ सोडली आहे. याला आता आठवडा उलटला आहे, परंतू अद्याप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप तसेच बंगले वाटप झाले नव्हते. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरु आहेत. आज पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले वाटप झाले आहे.
छगन भुजबळ यांना सिद्धगड, दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला, हसन मुश्रीफ यांना क-8 विशाळगड देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड, धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुची -3 आणि अनिल पाटील यांना सुरुचि 8, संजय बनसोडे यांना सुरुचि 18 बंगला देण्यात आला आहे. मात्र, आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाहीय.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटपही करण्यात आले आहे. भुजबळ यांना दालन क्रमांक 201, मुश्रीफ यांना 407, वळसे पाटलांना 303 आणि बनसोडेंना 301 दालन मिळाले आहे. मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावर २०४ आणि २१२ दालन देण्यात आले आहे. आत्राम यांना 601, 602 आणि 604 दालन मिळाले आहेत. आदिती तटकरे यांना 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे.
उद्या मंत्रिमंडळ विस्तार?
राष्ट्रवादीच्या गटाला ताबडतोब मंत्रिपदे मिळाल्याने शिंदे गट नाराज झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणते खाते कोणाला देणार यावरूनही घोडे अडले आहे. यातच आता उर्वरित १४ खात्यांचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या केला जाण्याची शक्यता आहे. राजभवनावर दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु असल्याचे समजते आहे. यामध्ये सात मंत्रिपदे शिवसेनेला मिळणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.