मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:13 IST2020-02-17T13:12:51+5:302020-02-17T13:13:02+5:30
भाजपला सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक
मुंबई : आम्ही सत्तेत पुन्हा येणार, तर राज्यात मध्यवधी निवडणुका लागू शकतात असे दावा सतत भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर यावरूनच राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर याचवेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली.
एक मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले की, आम्ही सत्तेत येणार असाच विचार दिवसभर भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात सुरु असतो. रात्रीही त्यांना हेच स्वप्न पडत आहे. भाजपला सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
तर हे सरकार 5 वर्षे चालणार आहे. तसेच आमची 25 वर्षांसाठी आघाडी असल्याचे आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. तर मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल, असेही ते यावेळी म्हणाले.