'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:01 IST2019-09-23T15:59:08+5:302019-09-23T16:01:31+5:30
नवाब मलीक यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं'
मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजप पक्षात चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या गॅगचे लोकं मोठ्याप्रमाणात कार्यरत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानातील लोकांची प्रशंसा केल्यानंतर भाजपकडून टीका होत असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना नवाब मलिक म्हणाले की, भाजपमध्ये दाउद गॅगचे लोकांची मोठी संख्या आहे. तर उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजेश सिंह यांचा १९९२ मध्ये झालेल्या जे.जे. हत्याकांड सहभाग होता. त्यांचा दाउद गँगंशी संबध असल्याचा दावा मलिक यांनी केला. तर याप्रकरणी खासदार सिंह यांच्यावर टाडा सुद्धा लावण्यात आला होता, असा आरोप सुद्धा मलिक यांनी केला आहे.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, भाजपच्या आयटी सेलमध्ये सुद्धा दहशतवादी संघटना असलेल्या ISIS ची लोकं कार्यरत असून त्यांना अनेकवेळा अटक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे ज्यांची अशी परिस्थिती असेल अशा लोकांनी आमच्या बाबतीत बोलू नयेत. तसेच चाळीस पैश्यासाठी ट्विट करणाऱ्या आम्ही भाव देत नसल्याचे मलिक म्हणाले. त्यामुळे मलिक यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.