रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:57 PM2023-12-01T16:57:45+5:302023-12-01T17:00:35+5:30

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांवर थेट टीका करणं टाळलं आहे. मात्र आता अजित पवार यांनी पहिल्यांदाच रोहित पवारांना फटकारलं आहे.

NCP leader Ajit Pawar slams party MLA and nephew Rohit Pawar | रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार

रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार

कर्जत : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आज कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली. आम्ही सत्तेत सहभागी होण्यासाठी आधी शरद पवार यांची सहमती होती, मात्र नंतर त्यांनी भूमिका बदलली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. तसंच आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार गटाच्या इतर नेत्यांवरही हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी आपला पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पहिल्यांदाच जाहीररित्या टीकास्त्र सोडलं आहे. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत, असं ते म्हणाले. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यावरून निघालेली रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा येत्या १२ डिसेंबरला नागपूरला धडकणार आहे. या यात्रेवरून नाव न घेता रोहित पवारांवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, "काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे कसला संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष?" असा खोचक सवाल करत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. तसंच यावेळी जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी डिवचलं. "मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसं आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला, अरे कशासाठी?  त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो, कारण आपल्यात तशी हिंमत आहे," असं अजित पवार म्हणाले.

लोकसभेला किती जागा मिळणार?

आगामी निवडणुकांबद्दल भाष्य करताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "यापुढे मी आठवड्याच्या सात दिवसांपैकी तीन दिवस मुंबईला, एक दिवस पुण्याला आणि उर्वरित तीन दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे. पक्षवाढीसाठी मलाही जास्त काम करावं लागणार आहे. असं काम प्रदेशाध्यक्षांना करावं लागेल, सगळ्या सेलच्या प्रमुखांना करावं लागेल आणि आपल्या मंत्र्यांनाही करावं लागेल. सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवाव्या लागतील. मागे एक बातमी आली की, लोकसभेला भाजप २६ जागा लढवणार आहे. पण तुम्ही त्याबाबतची काळजी करू नका. जी काही आपली ताकद आहे, त्यानुसार आपल्याला व्यवस्थित जागा मिळतील. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा आणखी मजबूत होईल, यासाठीची शिदोरी घेऊन आपआपल्या भागात काम करण्यासाठी जाऊया," असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.

Web Title: NCP leader Ajit Pawar slams party MLA and nephew Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.