मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:08 IST2023-12-03T16:59:57+5:302023-12-03T17:08:41+5:30
अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचत पक्षाच्या शिबिरात केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

मला खेळखंडोबा करायचा नाही, पण...; पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजितदादांची रोखठोक प्रतिक्रिया
रायगड :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गटांत सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाने आपल्या राज्यव्यापी शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन काल शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे बोलताना पुन्हा एकदा आपण केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र त्याचवेळी याबाबत सतत भाष्य करून मला खेळखंडोबा करायचा नाही, असंही ते म्हणाले.
माझ्याकडे भरपूर माहिती असून ती मी पुस्तक लिहिल्यावर समोर येईल, असं अजित पवार गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं. त्यावर काल शरद पवारांनी पलटवार केला होता. लोक पक्षांतर करून भाजपसोबत कसे जातात, याबाबत पुस्तकातून वाचायला आवडेल, असं पवार म्हणाले होते. याबाबत आज श्रीवर्धन येथे अजित पवारांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर केलेल्या प्रतिहल्ल्याबाबत बोलणं टाळत अजित पवार म्हणाले की त्याचं उत्तर प्रफुल्लभाईच देऊ शकतील. मात्र यावेळी बोलताना अजित पवार यांनी पक्षाच्या शिबिरात मांडलेली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
अजित पवार यांनी म्हटलं की, "खरं सांगू का? मी काय बोललो की त्यांनी उत्तर द्यायचं...त्यांनी काय बोललं की मी उत्तर द्यायचं, असला खेळखंडोबा मला करायचा नाही. पण मी जे बोललो, ते त्रिवार सत्य आहे. तुम्हालाही माहीत आहे की, मी २ जुलैला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अधिवेशन काळातच आम्ही सर्व मंत्री चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. मग आमच्याबद्दल तुम्हाला राग होता तर आम्हाला येऊनच नव्हतं द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी सर्व आमदारही भेटले. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी परत आम्ही भेटलो. हे सगळं त्रिवार सत्य आहे."
"माझ्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडली तर मी दिलगिरी व्यक्त करून माघार घेईल, पण पक्षाच्या शिबिराच्या निमित्ताने मी जे बोललो ते खरंच बोललो. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. त्यांनाही माझं ३०-३२ वर्षांचं समाजकारण, राजकारण माहीत आहे. मी छक्के पंजे करणारा माणूस नाही, मी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे. आज एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, हा माझा स्वभाव नाही," अशा शब्दांत अजित पवारांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.
अजित पवारांबद्दल काय म्हणाले शरद पवार?
अजित पवारांनी पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या आरोपांना काल शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं. "मी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसोबत मागील ६० वर्षांपासून काम करत आहे. वैयक्तिक हल्ले, टीका-टिपण्णी याची सवय मला आहे. पण ही टीका किती योग्य आहे, ती कोण करतंय, ती योग्य आहे की नाही, हे लोक ठरवत असतात. त्यामुळे कुठूनही असे हल्ले झाले तरी हरकत नाही," असं ते म्हणाले.