हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 17:45 IST2023-03-20T17:44:38+5:302023-03-20T17:45:14+5:30
"एका महिन्याच्या 'दूध का दूध, पानी का पानी' करा"

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप
मुंबई दि. २० मार्च - हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. तसेच, या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा मंत्री महोदयांनी करावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
"एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून 'दूध का दूध, पानी का पानी' करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना रहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे रहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी. नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी," अशा विविध मुद्द्यांवर जयंत पाटील यांनी आक्रमकपणे मतं माडंली.
"कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे," असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.