Maharashtra Politics: “जो माणूस बायकोला साधी साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला”; नाथाभाऊंचा शहाजीबापूंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:55 IST2022-10-27T13:49:25+5:302022-10-27T13:55:34+5:30
Maharashtra News: शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानावर एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.

Maharashtra Politics: “जो माणूस बायकोला साधी साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला”; नाथाभाऊंचा शहाजीबापूंवर घणाघात
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आणि केवळ एका डायलॉगमुळे देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राज्यातील अनेक भागांना भेटी दिल्या. तसेच विविध मुद्द्यांवर रोखठोक शब्दांत प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, गरिबीमुळे बायकोला साडी घ्यायला जमली नाही, असे शहाजीबापू यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शहाजीबापू पाटील यांना टोला लगावला आहे.
जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा असे आजवर मानत आलो आहे. सन १९९९ मध्ये माझा पराभव झाला. या पराभवानंतर इथे जमलेली माझ्या मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल, माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील मिळत नव्हती. १९ वर्ष सातत्याने घरात गरीबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. यावर एकनाथ खडसे यांनी शहाजीबापूंवर निशाणा साधला.
जो माणूस बायकोला साधी साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला
शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगताना म्हटले की, त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. कदाचित गंमतीने शहाजीबापूंनी ते विधान केले असेल, किंवा उद्वेगातून केले असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला, असा सवाल करत हे कोणत्या हेतूने म्हटले ते मला माहिती नाही. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली. त्यामुळे आता त्यांना कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.
दरम्यान, गुवाहाटीत असताना एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना, माझ्या बायकोला साधी एक साडी घेणे शक्य झाले नाही, असे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर बोलताना, मी ती साडी घेतली नाही, कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा कुणीही माझ्यासोबत नव्हते, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"