“रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ हजार रुपये खात्यात जमा होणार”: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:27 IST2024-07-22T13:24:34+5:302024-07-22T13:27:14+5:30
NCP DCM Ajit Pawar News: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे, असे अजित पवार म्हणाले.

“रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ हजार रुपये खात्यात जमा होणार”: अजित पवार
NCP DCM Ajit Pawar News: एकीकडे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असली तरी या योजनेवरून विरोधी महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. यातच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पारनेर येथील एका सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. या योजनेसाठी कुणाला एक रुपया देणे गरजेचे नाही. ज्यांनी असे पैसे घेतले त्यांना काढून टाकले आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या महिला करतात. तो फॉर्म नीट-नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, थोड्या अडचणी येऊ शकतात. १ जुलैपासून ही योजना सुरु केली आहे, असे अजित पवार म्हणाले.
रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ हजार रुपये खात्यात जमा
तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना १५०० रुपये देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका, अशी गॅरंटी अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, ज्या गरीब माय माऊली आहे, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. आमच्या माय-माऊलींच्या अकाऊंटला ३ हजार रुपये जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत. इतकी चांगली योजना असूनही विरोधक माझ्यावर टीका करतात, असे अजित पवार यांनी सांगितले.