मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 20:39 IST2025-02-24T20:38:55+5:302025-02-24T20:39:56+5:30

संजय राऊतांच्या या टीकेचा आता शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

ncp chief Sharad Pawar counterattacks shiv sena sanjay Raut in a special style | मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

NCP Sharad Pawar: नवी दिल्ली इथं आयोजित मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शरद पवारांची ही कृती महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी आहे, असं खासदार राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेचा आता शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेत प्रत्युत्तर दिलं आहे.

"मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी कोणाची परवानी घ्यावी लागणार का?" असा प्रश्न शरद पवार यांनी संजय राऊत यांना उद्देशून विचारला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी पवार यांनी अन्य राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून वादात सापडले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणीच्या मुद्द्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले की, "मी त्या गावात जाऊन आलोय, तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्यावर ज्या व्यक्तीला स्वाभिमान असेल तो व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. पण सबंध राज्यातील लोकांकडून हल्ला होत असताना पदाला चिटकून राहण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. शेवटी याचे व्यापक परिणाम राज्यात दिसतील. आरोप झाल्यानंतर यापूर्वीही अनेकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पण नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध आहे, असं मला जाणवत नाही," असा टोला पवारांनी लगावला आहे.

दरम्यान, महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगल्याची चर्चा आहे. यावरही पवार यांनी मिश्कील भाष्य केलं. "याबाबत आमच्याकडे माहिती नाही, तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला द्या. त्या माहितीचा कसा उपयोग करायचा, हे आमचं कौशल्य तुम्ही काही दिवसांनी बघा," असं पवार म्हणाले.
 

Web Title: ncp chief Sharad Pawar counterattacks shiv sena sanjay Raut in a special style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.