NCP ( Marathi News ): आजपासून शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवस अधिवेशन होणार आहे. याबाबत काल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली होती. या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या ऑफिसकडून याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहे. १८, १९ जानेवारी असं दोन दिवस पक्षाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
छगन भुजबळ उपस्थित राहणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही, यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या वर्षी पहिल्यांदाच शिर्डीत अधिवेशन होत आहे. आता या अधिवेशनाला माजी मंत्री थगन भुजबळ उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वाल्मीक कराडमुळे मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी
पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप वाल्मीक कराड याच्यावर होत आहे. या खंडणीमुळेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यातल आला आहे. वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप सुरू आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरू आहे.