‘त्या’ कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:36 IST2025-01-06T14:32:46+5:302025-01-06T14:36:09+5:30
NCP AP Group MLA Chhagan Bhujbal PC News: एका कार्यक्रमात एकाच मंचावर असताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीत नेमके काय होते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली होती.

‘त्या’ कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
NCP AP Group MLA Chhagan Bhujbal PC News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि छगन भुजबळ एका कार्यक्रमात एकाच मंचावर होते. याबाबत छगन भुजबळ यांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. या भेटीची बरीच चर्चा रंगली. याच कार्यक्रमात शेजारी शेजारी बसलेले असताना शरद पवार यांनी भुजबळांना काहीतरी लिहून दिल्याचे दृश्य सर्वांनी पाहिले. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलेल्या चिठ्ठीत नेमके काय होते, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. याबाबत आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘त्या’ कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिले होते?
पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांना त्या चिठ्ठीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, त्यावर काय लिहिलं ते सांगू? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ, असे उत्तर देत छगन भुजबळ हसले. तरीही पर्दा ना उठाओ, असे तुम्ही म्हणताय की शरद पवारांनी त्या चिठ्ठीत तसे लिहिले होते, असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना, मी सांगितले ना, उत्तर दिले की आता, असे सांगत छगन भुजबळ यांनी या प्रश्नाला बगल दिली.
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.