“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:39 IST2025-11-05T10:39:07+5:302025-11-05T10:39:07+5:30

NCP Ajit Pawar Group MP Sunil Tatkare News: कुठल्याही पद्धतीची सबब न सांगता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधकांनी या निवडणूकांना सामोरे जावे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला.

ncp ajit pawar group mp sunil tatkare said final decision in local body elections by coordinating with the mahayuti | “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

NCP Ajit Pawar Group MP Sunil Tatkare News: निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला वेग देण्याचे सूचित केलेले आहे. बर्‍याच ठिकाणी संपर्कमंत्री व पालकमंत्री नेमलेले आहेत ते त्या-त्या जिल्ह्यात जातील. पक्षाच्या बैठका घेतील. यावेळी त्यांना महायुतीमध्ये समन्वय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अनुषंगाने जिल्हानिहाय बैठका सुरू झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मराठवाडा आणि कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली तर दुसऱ्या दिवशी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह वरील जिल्ह्यातील पक्षाचे विधिमंडळ विधानसभा, विधानपरिषद सदस्य, माजी खासदार, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

स्वबळाचा नारा सर्व ठिकाणी दिला गेला, असे काही नाही

स्वबळाचा नारा सर्व ठिकाणी दिला गेला, असे काही नाही. निवडणुकीत नगरपालिका व नगरपंचायत विभागात वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. तेथील शहर अध्यक्षांनी आणि प्रमुखांनी आम्हाला त्याबद्दल अवगत केले आहे. आमची स्पष्टपणाची भूमिका आहे. महायुतीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. संपर्कमंत्री आणि पालकमंत्री आम्हाला याबाबत माहिती देतील. त्यानंतर आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. मतदान केंद्रामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो. तो याबाबत खबरदारी घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा करण्यापेक्षा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यावेळी जी काही सतर्कता दाखवायची आहे ती राजकीय पक्षांनी दाखवली तर या विषयावरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

विरोधकांनी काय भूमिका घ्यावी तो विरोधकांचा प्रश्न आहे

विरोधकांनी काय भूमिका घ्यावी तो विरोधकांचा प्रश्न आहे. शेवटी दुबार मतदारांची नोंदणी जर का असेल तर मतदान करत असताना एकदाच मतदान करता येते. प्रत्येक बुथनिहाय मतदान केंद्रनिहाय प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी त्याठिकाणी असतात. त्यामुळे असे वाटते की, काही वेळ त्यावेळी दुबार मतदान होतेच असा भाग नाही. त्यावेळी खबरदारी प्रत्येक राजकीय पक्षाला घेता येऊ शकते. दीर्घकाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे कुठल्याही पद्धतीची सबब न सांगता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधकांनीही या निवडणूकांना सामोरे जावे, असा टोला सुनील तटकरे यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतमधील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. महायुतीमधील एकंदरीत समन्वय आणि भविष्यात काय करायचे यासंदर्भात ठोस भूमिका सांगण्यात आली. प्रत्येक नगरपालिकानिहाय वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. आम्हालाही सन्मानपूर्वक जागा मिळणे आवश्यक आहे आणि आम्ही जिथे ताकदवान आहोत तिथे आमच्या सहकारी पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळणे आवश्यक आहे. मात्र चर्चेअंती यावर योग्य निर्णय होईल, हेही सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

 

Web Title: ncp ajit pawar group mp sunil tatkare said final decision in local body elections by coordinating with the mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.