रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:20 IST2025-11-13T15:16:11+5:302025-11-13T15:20:43+5:30
NCP Ajit Pawar Group Rupali Thombre News: प्रवक्तेपदावरून दूर केल्यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे.

रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
NCP Ajit Pawar Group Rupali Thombre News: रुपाली चाकणकरांना घेरणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाने स्पष्ट मेसेज दिला. तर अमोल मिटकरी यांनाही अजित पवारांनी धक्का दिला. पुण्यातील रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्त्यांची नवीन नावे जाहीर केली आहेत. यानंतर आता रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव आता स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांना साइडलाइन केले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसात प्रकर्षाने समोर आले आहे. याप्रकरणी पक्षाने रुपाली ठोंबरे यांना नोटीस बजावली असून त्यांना म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तर येत्या दोन दिवसात आपण भूमिका मांडणार असल्याचे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर आता आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात रुपाली ठोंबरे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
४० स्टार प्रचारकांची यादी
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली. या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह अनेकांची नावे आहेत. या यादीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, प्रतिभा शिंदे यांचा समावेश या यादीत आहे.
दरम्यान, स्टार प्रचारकांच्या यादीतून रुपाली ठोंबरे यांना स्थान देण्यात आलेले नाही. परंतु, दुसरीकडे अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरून दूर करण्यात आले असले तरी स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमोल मिटकरींवर आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.