NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari: सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण पूरस्थितीने मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला असून, पिकांसह माती खरडून निघाल्याने शेतशिवारांना नदीचे स्वरूप आले आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली जिल्ह्यांत पाऊस झाला. अनेक भागांत पूर असल्याने नुकसानग्रस्त शिवारांचे पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत. यातच शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध स्तरांतून केले जात आहे.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार-खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री, आमदार तसेच भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. तसेच बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला. समाजाच्या विविध स्तरांतून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मराठी कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अमोल मिटकरी यांनी सोनू सूदचे उदाहरण दिले आहे.
मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी
अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट करत सदर आवाहन केले आहे. सर्व मराठी कलावंत, पुणे-मुंबईत राहणारे सिनेअभिनेते, गायक, शाहीर, यांना विनंती. सोनू सूद जसा पंजाबच्या मदतीला धावला, तितके नाही पण निदान फुलाच्या पाकळी इतकी तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवाना मदत करा. याच मराठवाड्याने आपल्याला फाळके ते महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहचविले आहे, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मराठवाड्यात गेल्या दहा दिवसातील पावसामुळे तब्बल ८६ जणांचा पुरात वाहून जीव गेला, तर १७२५ जनावरे दगावली. तीन जिल्ह्यांत अद्याप पंचनाम्यांना वेग आलेला नाही. पूर ओसरल्यानंतर शेतशिवारातून काही पिके वाचविता येतात का? किंवा बुडालेल्या घरातून काही वस्तू मिळतात का याचा शोध लोक घेत आहेत. मराठवाड्यात १६५ मिमी पाऊस जास्तीचा झाला असून, हे प्रमाण १२४ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी ७९४ मिमी पाऊस झाला होता. १२० टक्के हे प्रमाण होते. परभणी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने झालेले नुकसान पाहता शेतकरी त्रस्त झाले आहेत. असे असताना पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Web Summary : Amol Mitkari appealed to Marathi artists to support Marathwada flood victims, citing Sonu Sood's Punjab aid as an example. Marathwada faces severe flood damage, with numerous casualties and livestock losses. Financial assistance is coming from government officials.
Web Summary : अमोल मिटकरी ने मराठी कलाकारों से मराठवाड़ा बाढ़ पीड़ितों का समर्थन करने की अपील की, सोनू सूद की पंजाब सहायता का हवाला दिया। मराठवाड़ा में भारी बाढ़ से नुकसान हुआ है, कई लोगों की मौतें और पशुधन की हानि हुई है। सरकारी अधिकारियों से वित्तीय सहायता आ रही है।