मुख्यमंत्री फडणवीसांकडून नावेदला मिळाली ईदची खरी भेट, तरुणाला ३० लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:54 IST2025-04-01T18:52:24+5:302025-04-01T18:54:09+5:30
Devendra Fadnavis News: एका २३ वर्षाच्या तरुणाला कर्करोगाशी लढण्याचं बळ मिळालं. त्याला सरकारकडून ३० लाख रुपयांची मदत मिळाली.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नावेदला मिळाली ईदची खरी भेट, तरुणाला ३० लाखांची मदत
मुंबई : अमरावतीमधील २३ वर्षीय नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली. काही वर्षांपासून तो ब्लड कॅन्सरशी (तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया) लढतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने नावेदवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅन्सरमुळे नावेदचे १२ किलो वजन घटले होते. २०२३ मध्ये पहिल्यांदा निदान झालेल्या या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने कटंबावर मोठे संकट आले.
वडील कापड दुकानात कामाला
त्याचे वडील अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात. तीन मुलींचे शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना नावेदच्या उपचारांसाठी आवश्यक ३० ते ३५ लाख रुपये उभे करणे त्यांना अशक्यप्राय होते.
वाचा >>‘नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? चर्चेला विराम’ देवेंद्र फडणवीस म्हणाले...
उपचाराच्या खर्चाची रक्कम ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर नावेदच्या वडिलांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके व सुलभा खोडके यांच्याकडे धाव घेतली. आमदारांनी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले.
नावेदच्या मदतीला कसे मिळाले ३० लाख रुपये?
नावेदला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये, टाटा ट्रस्टकडून १५ लाख रुपये, तर उर्वरित रक्कम धर्मादाय रुग्णालयाच्या मदतीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली.
परिवाराने मानले मुख्यमंत्री फडणवीस आणि इतरांचे आभार
नावेद आमच्यासाठी केवळ मुलगा, भाऊ नाही, तर आमच्या 'आयुष्याचा आधार' आहे. कॅन्सरने त्याला कमकुवत केले होते, पण त्याला मिळालेल्या मदतीमुळे तो पुन्हा उभा राहू शकतो, हीच आमच्यासाठी ईदची सर्वांत मोठी भेट आहे. मुख्यमंत्री फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि त्यांच्या टीमचे आम्ही आभार मानतो, असे त्याच्या परिवाराने सांगितले.