मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 08:57 IST2020-09-24T08:50:12+5:302020-09-24T08:57:01+5:30
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती.

मराठा आरक्षणाबाबत चर्चेस मोदींची टाळाटाळ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना अद्याप उत्तर नाही
नवी दिल्ली/मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाता तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खासदार संभाजी राजे यांनी तीन पत्रे पाठवली होती. मात्र या पत्रांना पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही,
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजी राजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत तीन पत्रे पाठवली आहेत. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या या पत्र्यांवर होत्या. मात्र या पत्रांना अजून उत्तर मिळू शकलेले नाही. या संदर्भातील वृत्त टीव्ही नाईन मराठीने प्रसारित केले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अॅटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय़ सरकारने घेतला पाहिजे. अॅटॉर्नी जनरलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असला पाहिजे. कारण अॅटॉर्नी जनरल ह सरकारचा माणूस आहे, असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. यापुढे आरक्षणाची लढाई ही एक मराठा लाख मराठा या बॅनर खालीच लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.
राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा करणार 'आक्रोश आंदोलन'
घटनेप्रमाणे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण 'एसीबीसी' संरक्षित राहावे. ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाची वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याकरिता चारही प्रमुख पक्षांच्या कार्यालयासमोर 'आक्रोश आंदोलन' करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.