नांदेडमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार, माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:07 AM2021-10-18T08:07:47+5:302021-10-18T08:08:05+5:30

भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद मात्र वाढली आहे.  

in nanded bhaskar khatgaonkar omprakash pokarna left BJP joins congress | नांदेडमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार, माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले

नांदेडमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार, माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले

googlenewsNext

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच त्या मतदारसंघात वर्चस्व असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपला जय श्रीराम केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद मात्र वाढली आहे.  

जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली. रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्याबरोबर माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आणि इतर समर्थकांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.    

तीन वेळेस देगलूर मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळेस खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत आले होते. त्यावेळी जिल्हा भाजपची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. परंतु मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेतून भाजपत आले. भाजपच्या तिकिटावर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन चांगलेच वाढले होते. 

...म्हणून घरवापसी
जिल्हा भाजपतील सर्व निर्णय चिखलीकर हेच घेत होते. त्यामुळे खतगावकर गोटात नाराजी होती. देगलूर मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवितानाही खतगावकर यांचे मत विचारात घेतले नाही. याबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करूनही नेतृत्वाने चिखलीकरांनाच ताकद दिली. त्यामुळे खतगावकर यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला. 

माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करतो. खतगावकरांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळेल.   
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

Web Title: in nanded bhaskar khatgaonkar omprakash pokarna left BJP joins congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.