Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:33 IST2021-05-29T16:31:22+5:302021-05-29T16:33:07+5:30
महाराष्ट्र काँग्रेस उद्यामोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे.

Modi Govt: मोदी सरकारच्या कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला: नाना पटोले
मुंबई:नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून, त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून देश रसातळाला नेला. मोदींच्या सात वर्षातील या काळ्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस उद्या, रविवारी ३० मे २०२१ रोजी राज्यभर आंदोलन करत मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (nana patole said congress to stage statewide protests against modi government)
यासंदर्भात अधिक माहिती देताना पटोले म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाने दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की, लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही.
“सत्तेसाठी मती गेली... आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे आता कोडगेपणाने सांगू नका”
मोदींच्या या जुलमी, अहंकारी, हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या, रविवारी ३० मे रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. काळे कायदे आणले गेले, याचे निदर्शक म्हणून काळे झेंडे दाखवले जातील. निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवले जातील. तसेच राज्यातील प्रत्येक विभागात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर खा. कुमार केतकर मोदी सरकारच्या सात वर्षाचे अपयश ऑनलाईन व्याख्यानातून उघड करतील. कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालून करून हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.