“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:48 IST2025-04-19T16:48:17+5:302025-04-19T16:48:37+5:30
Congress Nana Patole News: काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येयधोरण गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
Congress Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला तसेच यश विधानसभा निवडणुकीत मिळेल, अशी आशा होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. यानंतर काही दिवसांनी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला. तर हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. तर विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसले, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला. यातच आता पाच वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा दावा नाना पटोले यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी नाना पटोले निवडून आले. यावरून नाना पटोले यांच्या विरोधकांनी खोचक टोलेबाजी केली. यातच भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका. यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावे आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा भावना या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे.
५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल
नाना पटोले यांनी, कार्यकर्त्यांनी केवळ पद न घेता त्यांची जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडावी आणि पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येयधोरण गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावे. कार्यकर्त्यांनी पाच वर्ष मेहनत घ्या, पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असताना कार्यकर्त्यांनी कधीही कुठलीही अपेक्षा व्यक्ती केली नव्हती. मात्र, त्याच कार्यकर्त्यांनी आता नाना पटोले प्रदेशाध्यक्ष नसल्याने त्यांच्या मनातील खदखद या मेळाव्यात बोलून दाखविल्याचे चित्र बघायला मिळाले.