नाना पटोलेंचे काँग्रेसकडून यथायोग्य पुनर्वसन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:10 IST2019-11-30T13:08:43+5:302019-11-30T13:10:40+5:30
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर पटोले यांनी अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे.

नाना पटोलेंचे काँग्रेसकडून यथायोग्य पुनर्वसन !
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले विदर्भातील नेते नाना पटोले यांचं पुनर्वसन काँग्रेसकडून करण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभेला निकराची झुंज देणाऱ्या पटोले यांना काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद देऊ केले आहे. आगामी काळात भाजपने सरकार पाडण्यासाठी काही प्रयत्न केल्यास, विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत पटोले भाजपशी सहज दोन हात करू शकतील, असाही त्यामागे हेतू आहे.
पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी कोणीही धजावत नसताना नाना पोटले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदींना आव्हान दिले होते. त्यामुळे मोदींची त्यांच्यावर नाराजी होती. त्यानंतर पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी गडकरी यांच्याविरुद्ध चांगलीच फाईट दिली होती. त्या फळ त्यांना मिळत नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.