Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:50 IST2025-10-23T18:48:26+5:302025-10-23T18:50:16+5:30
Nagpur Graduates Constituency Election: विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला वर्षभराचा कालावधी असला तरी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली.

Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
नागपूर: विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला वर्षभराचा कालावधी असला तरी कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, भाजपचा चेहरा कोण असेल याबाबत अद्यापही घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पक्षातील हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात मतदार नोंदणी सुरू आहे व जो लोकांना जोडत आहे पक्ष त्याच्याच पाठीशी उभा असेल, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पक्षाकडून कोहळेंच्याच नावाचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार याठिकाणी निवडून गेला नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील एकेकाळी याच मतदारसंघातून विधानपरिषदेत निवडून गेले होते. मात्र, २०२० मध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ परत काबीज करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने वर्षभराअगोदरच तयारी सुरू झाली आहे.
माजी आमदार सुधाकर कोहळे यांना मतदार नोंदणी प्रमुख बनविण्यात आले होते. आता नोंदणीला आणखी गती आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू मानले जाणारे सुधीर दिवे यांच्याकडे मतदार सहनोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याचे मोठे आव्हान या दोघांसमोरही देण्यात आले आहे. कोहळे व दिवे यांच्यापैकी कुणाला पदवीधरची उमेदवार मिळणार याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पक्षाची भूमिका मांडत थेट संकेतच दिले आहेत. मतदार यादीच्या नोंदणीचे काम कोहळेच्या नेतृत्वात सुरू आहे. ते झोकून देऊन काम करत आहेत व जो मन लावून काम करतो, पक्ष त्याच्या पाठीशी उभा राहतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले. विशेष म्हणजे त्यावेळी कोहळे मुख्यमंत्र्यांच्या जवळच बसले होते.