'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:21 IST2023-11-21T16:20:01+5:302023-11-21T16:21:45+5:30
नागपुरातील दाम्पत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बाबा मस्की आणि शोभा मस्की अशी मंत्र्यांना धमकी देणाऱ्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या धमकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत बाबा मस्की आणि त्यांच्या पत्नी शोभा मस्की या देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे घेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होत्या. हा व्हिडिओ भाजप कार्यकर्त्यांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी तात्काळ गडचांदूर पोलीस स्थानकात धाव घेत याबाबतची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मस्की दाम्पत्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
धमकीचं कारण काय?
बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने विविध मुद्द्यांवर अनेकदा आंदोलने केली आहेत. वेगळा विदर्भ, अतिक्रमित शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे आणि वन्यजीवांद्वारे पिकांचे होणारे नुकसान याबाबत सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याचं सांगत मस्की दाम्पत्याने फडणवीस आणि मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, या धमकीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.