नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:34 IST2024-12-29T08:34:26+5:302024-12-29T08:34:51+5:30

एमएडीसीची सहकंपनी असलेली एमआयएल या कंपनीकडे हे या विमानतळाचे संचालन आहे. जीएमआर एअपोर्टस लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीला या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट आधीच देण्यात आले आहे.

Nagpur Airport development, 786 hectares of land to 'MIHAN'; Decision in meeting chaired by Chief Minister | नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे (एमएडीसी) असलेली ७८६ हेक्टर जागा मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

 एमएडीसीची सहकंपनी असलेली एमआयएल या कंपनीकडे हे या विमानतळाचे संचालन आहे. जीएमआर एअपोर्टस लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीला या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट आधीच देण्यात आले आहे. आता ७८६ हेक्टर जमीन ही एमआयएलला दिल्यामुळे विमानतळ विकासाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या एप्रिलपासून हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. 

राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली.  केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकास, त्यांचे विस्तारीकण, नाइट लँडिंगची सुविधा, धावपट्टीची लांबी वाढविणे, विमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, शिर्डी, अमरावती (बेलोरा), पुरंदर, कराड, चंद्रपूर (मोरवा), सोलापूर, धुळे, फलटण, अकोला, गडचिरोली या विमानतळांच्या कामांचाही आढावा घेतला. 

रिलायन्सकडील विमानतळ तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश
राज्यातील काही विमानतळे चालविण्यासाठी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडला देण्यात आली आहे. या कंपनीबाबत अनेक तक्रारी आहेत, विमानतळांचा बोजवारा उडाला आहे. ही विमानतळ तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही तातडीने  करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Web Title: Nagpur Airport development, 786 hectares of land to 'MIHAN'; Decision in meeting chaired by Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.