राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैष्णवी हिच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, या अहवादालमधून काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवी हिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले होते. त्यानंतर वैष्णवी हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवी हिचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली, असा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीतून केला होता. दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदन अहवालामधून गंभीर माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे हिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झालेला असू शकतो, अशी शक्यता आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. दरम्यान, वैष्णवी हिचे सासरे राजेंद्र हगवणे हे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.