नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५: रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:10 IST2025-12-01T06:09:36+5:302025-12-01T06:10:11+5:30
Local Body Elections: नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस; महायुतीमध्ये संघर्ष तर, विरोधक निस्तेज

नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५: रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
मुंबई : राज्यातील नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री १० वाजता थांबणार असून गेल्या काही दिवसांपासून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धार पहायला मिळाली. यात विशेषतः भाजप आणि शिंदेसेना आणि काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवार गट असा सामना पहायला मिळत आहे.
सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी प्रचारात आश्वासनांचा पाऊस पाडला. या तीन नेत्यांनी सर्वाधिक सभा घेतल्या, तर प्रचारातही या तीन पक्षांचा जोर राज्यभर दिसत होता. दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका होता.
रविवारी सर्वच पक्षातील प्रमुख नेते राज्यभर प्रचाराच्या दौऱ्यावर होते, तर सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक पक्षांनी अंतिम शक्तिप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित केले आहेत. मुंबई लगतगतच्या आणि तळ कोकणात काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेसेना असा थेट सामना असल्याने या दोन पक्षातील वाद आणि मतभेद यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. विशेषतः सिंधुदुर्ग आणि पालघर, अंबरनाथ अशा ठिकाणी हा संघर्ष टोकाचा होता.
शिंदे नारायण राणेंना भेटले, नीलेशना खुला पाठिंबा
मालवण : आमदार नीलेश राणे ही शिवसेनेची भगवी रेष आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. काहींना पराभव दिसायला लागला की त्यांचा दशावतार सुरू होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला. शिंदे थेट नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी नीलरत्न बंगल्यावर गेले. सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.
विसरू नका... उद्या मतदान आहे!
२ डिसेंबर रोजी मतदान होत असलेल्या नगरपालिका-नगरपंचायतीक्षेत्रात सुट्टी जाहीर केली आहे.
मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे.
मतदानाची वेळ
मंगळवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल.
मंत्रिमंडळ 'फुल्ल', आता 'व्हॅकन्सी' नाही : फडणवीस
ईश्वरपूर (जि. सांगली) : माझ्या मंत्रिमंडळात एकही व्हॅकन्सी नाही, असा टोला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. महायुतीमधील सर्व घटक पक्ष हे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.