शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निकालांचा अर्थ काय सांगतो?

By यदू जोशी | Updated: January 17, 2026 07:17 IST

महापालिकेच्या सत्तेत ठाकरे नसतानाची मुंबई कशी असेल? ठाकरेंची पुढची वाटचाल कशी राहील? हे प्रश्नही या निवडणुकीने तयार केले आहेत

यदु जोशी 

महापालिकांच्या रणसंग्रामात देवाभाऊंची जादू चालली. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. महापालिकेच्या सत्तेत ठाकरे नसतानाची मुंबई कशी असेल? ठाकरेंची पुढची वाटचाल कशी राहील? हे प्रश्नही या निवडणुकीने तयार केले आहेत. अजित पवार यांना त्यांच्याच प्रभावपट्ट्यात दणके बसले. राज ठाकरे यांना अपेक्षित यश मिळाले नाही. शरद पवार यांच्या पक्षाच्या पुढील वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मुंबईत ठाकरेंपेक्षा मीच भारी हे सिद्ध करण्यात एकनाथ शिंदे यांना अपयश आले तरी राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष हे सातत्य त्यांनी कायम राखले. मुंबईवरील पकड मजबूत करण्यासाठी अधिक काम त्यांना करावे लागणार आहे. एका निवडणुकीतील अपयशाने ठाकरे ब्रँड संपणार नाही, हे उद्धव यांना सिद्ध करावे लागेल. अर्थात भाजपशी टक्कर देताना त्यांनी मराठी मतांवरील आपला प्रभाव कायम ठेवला आहे. केवळ मराठी मतांवर मुंबईत सत्ता येऊ शकत नाही, या दाव्याला आजच्या निकालाने बळ दिले आहे.

'सबने किया झामल, झामल...' आजवरचे सर्वांत मोठे यश

नागपुरात मजिद शोला हे मुस्लीम नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी नारा दिला होता, 'सबने किया झामल, झामल चुनके आया कमल, कमल!' राज्यभरातील निकालांवर नजर टाकल्यानंतर हा नारा आठवला. जागोजागी कमळ फुलले, त्याने कुठे घड्याळ बंद पाडली तर कुठे तुतारीचा आवाज. कुठे मशाल विझवली आणि कुठे पंजाला धक्के दिले. देवाभाऊंच्या नेतृत्वात लढलेल्या भाजपला महापालिकांमधील आजवरचे सर्वात मोठे यश मिळवून दिले आहे. फडणवीस यांनी प्रचाराचा पॅटर्न यावेळी बदलवला. सभांमधील भाषणांबरोबरच सेलिब्रिटींबरोबरच्या त्यांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचारयंत्रणेने त्यांच्याबद्दलचे एक मोठे गुडविल सोशल मीडियावर तयार केले. त्यातून जेन-झीशी फडणवीस कनेक्ट झाले. इतर पक्षांना ते करता आले नाही. आदित्य ठाकरे यांनी थोडा प्रयत्न केला, पण ते फडणवीसांना गाठणे शक्य नव्हते. भाजपच्या प्रत्येक महापालिकेची

जबाबदारी असलेल्या नेत्यांनी फडणवीस यांना दमदार साथ दिली. त्यात मंत्री आशिष शेलार, आ. अमित साटम (मुंबई) मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (पुणे), मंत्री गणेश नाईक (नवी मुंबई), आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे (अकोला), Mumbai Main Page No. 8 Jan 17, 2026 Powered by: erelego.com मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे आमदार (सोलापूर), आ. महेश लांडगे, आ. शंकर जगताप (पिंपरी-चिंचवड), आ. नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे स्थानिक आमदार (नागपूर), मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार (नाशिक व जळगाव), मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड (छ. संभाजीनगर), खा. अशोक चव्हाण (नांदेड), कैलास गोरंट्याल (जालना) अशी काही उदाहरणे देता येतील. 

प्रभावी पक्षसंघटना हे भाजपचे मोठे शक्तिस्थळ. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते मतदारांना प्रत्यक्ष मतदानासाठी आणण्यापर्यंत राबणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजयात मोठे योगदान दिले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासाठीचे नियोजन केले. नगरपरिषद निवडणुकीत भाजप क्रमांक एक यावेळीही टिकवताना मागील चुका सुधारण्याचे काम केल्याचाही फायदा झाला.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक? 

१. फडणवीस यांच्या नेतृत्वाची कमाल 

२. स्थानिक नेत्यांची दमदार बॅटिंग 

३. पक्षसंघटनेने दिले मोठे योगदान 

४. आधीच्या चुका सुधारण्यावर भर 

५. प्रभावी पक्षसंघटनाचा फायदा

भाजपनंतर क्रमांक दोनचे यश मिळवून वर्चस्व केले सिद्ध

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपनंतर क्रमांक दोनचे यश महापालिका निवडणुकीत मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे. कुठे भाजपच्या मदतीने तर कुठे भाजपचा सामना करत त्यांनी जे यश मिळविले ते मुख्यमंत्रिपद जाऊन उपमुख्यमंत्रिपद वाट्याला आले असले तरी एक प्रभावी नेता म्हणून राज्याच्या राजकारणात आपण प्रस्थापित झालो आहोत, हे सिद्ध करणारे आहे. लोकसभा निवडणुकीपासून यशाचा त्यांचा सुरू झालेला प्रवास अखंडित आहे. महायुतीतील तिसरा पक्ष असलेली राष्ट्रवादी (अजित पवार गट) ही यशाबाबत वरखाली होत असताना शिंदेंनी त्या बाबत सातत्य राखले आहे. अजित पवारांना लोकसभेला एकच जागा मिळाली होती, विधानसभेत ४१ जागा मिळाल्या, नगर परिषदेतही चांगले यश मिळाले पण महापालिकेत आपटले. उद्या अधिक जागा सातत्याने देणारा मित्र पक्ष म्हणून शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात तुलना होईल तेव्हा भाजपला शिंदेच अधिक विश्वासार्ह वाटतील. नगरपरिषद निवडणुकीतही शिंदेसेना हा क्रमांक दोनचा पक्ष राहिला होता, ते सातत्य त्यांनी याहीवेळी राखले

. आपल्या उमेदवारांना आणि पक्षाच्या एकूणच यंत्रणेला सर्व प्रकारची रसद मोकळ्या हाताने पुरविणारा नेता हे शिंदे यांचे वैशिष्ट्य. या महापालिका निवडणुकीतही त्याचा अनुभव आलाच पण विविध महापालिकांमध्ये शिंदेंना मिळालेल्या यशाचे ते एकमेव कारण नाही. भाजपसोबत सत्तेत असूनही आपला पक्ष कसा वाढेल, इतर पक्षांमधून स्थानिक प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात कसे आणता येईल, स्थानिक सामाजिक समिकरणे आपल्या बाजूने कशी वळतील यासाठीचे सुनियोजित प्रयत्न ते करतात, त्याचे फायदे होतात. प्रचंड मेहनत, आणि सतत लोकांमध्ये राहणे आणि मदतीला धावून जाण्याच्या गुणांचाही फायदा झाला आहे. ठाण्याचा आपला गड जरी त्यांनी राखला तरी नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला ते धक्का लावू शकले नाहीत. मुंबईत ठाकरेंची सत्ता उलथविण्यासाठी भाजपला त्यांनी दमदार साथ दिली. मात्र, मुंबईच्या कोअर मराठी पट्ट्यात ठाकरेंपेक्षा आपली रेष मोठी करण्यात ते कमी पडले. ही रेष मोठी करण्याचे आव्हान आगामी काळात त्यांच्यासमोर असेल.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक? 

१. यशाच्या आलेख सतत चढताच

 २. नगरपरिषदेतही क्रमांक दोनचा पक्ष 

३. मोकळ्या हाताने रसद देणारा नेता 

४. सुनियोजित प्रयत्नांना आले यश 

५. मुंबईत वाढ करण्याचे आव्हान

काकांसोबत आघाडी केली पण तेल गेले आता तूपही जाईल ?

तेल गेले अन् तूपही गेले, अशी म्हण आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये काका शरद पवार यांच्या पक्षासोबत आघाडी करूनही दारुण पराभव पत्करावा लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या क्षणाची अवस्था 'तेल गेले...' अशी झाली आहे, आता भाजपशी जुळवून घेतले नाही तर तूपही गेले, अशी त्यांची अवस्था होऊ शकेल. पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये मोठे यश अजित पवार यांनी मिळवल्यानंतर महापालिका जिंकण्याची आकांक्षा निर्माण झाली. पुणे म्हणजे पवार हे समीकरण भाजपने आधीच दोन्ही महापालिकांवर झेंडा फडकवून मोडीत काढलेले होते. पण, एकसंध पवार भाजपला धक्का देऊ शकतील, असे वाटल्याने अजितदादांनी काकांचे बोट धरले, बहीण सुप्रिया आणि पुतण्या आ. रोहित पवार यांना सोबत घेतले आणि मित्रपक्ष भाजपला दणका देण्याची रणनीती आखली. पण, ते सपशेल अपयशी ठरले. पश्चिम महाराष्ट्रातील नेते आपापल्या शहरांवरील पकड मजबूत ठेवतात म्हणून राज्यात मोठे होतात असे वर्षानुवर्षे म्हटले जाते. या यादीत अजित पवार यांचे नाव आता नसेल. ते स्वतः पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण, या जिल्ह्यातील दोन्ही महापालिका निर्विवादपणे भाजपने जिंकून त्यांना मोठा धक्का दिला आहे.

एकीकडे भाजपसोबत राज्यात सत्तेत बसायचे आणि दुसरीकडे शरद पवारांसोबत निवडणूक लढायची, या डबलगेमने यश दिले नाहीच. पण अजित पवार हे आपले कायमचे विश्वासू मित्र राहतील की नाही, याबद्दल भाजपच्या मनात मोठी शंका निर्माण झाली आहे. हा विश्वास परत मिळवण्यासाठी अजितदादांना पुढच्या काळात मोठी कसरत करावी लागेल. जिल्हा परिषद निवडणुकीत काकांच्या पक्षाला सोबत घेण्याबाबत चिंतन करण्याची वेळही आजच्या निकालाने त्यांच्यावर आणली आहे. प्रचार काळात अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांचे काय होणार, त्यानिमित्ताने या दोन पक्षांमधील संबंध पुढच्या काळात कसे असतील आणि विशेषत अजित पवारांचे फडणवीस यांच्याशी संबंध कसे असतील हे महत्वाचा असेल.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

१. पुणे, पिंपरी चिंचवड हातून गेलेच 

२. डबलगेम करूनही पदरी अपयशच 

३. विश्वास कसा मिळवणार? 

४. भाजपवरील आरोपांचे काय ? 

५. पुढचा काळ कसोटीचा

घसरण काही केल्या थांबेना, अस्तित्वाचा प्रश्न झाला बिकट

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली घसरण नगर परिषद आणि आता महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल किंवा नवीन राजकीय निर्णय घ्यावा लागेल, असा बोध आजच्या निकालाने दिला आहे.

पुतणे अजित पवार यांनी साथ सोडताना, काका तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा खोचक सवाल केला होता. महापालिकेला त्याच पुतण्यासोबत सगळी (कथित) कटुता बाजूला ठेवत शरद पवार यांनी आघाडी केली. पुतण्याने त्यांचे उमेदवार घड्याळावर, तर काकांनी आपले उमेदवार तुतारीवर उभे करत वेगळे अस्तित्व जपूनही एकत्र लढण्याचा नवा प्रयोगदेखील करून बघितला. मात्र, तो सपशेल फसला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाचे मावळतीचे रंगही पुसट दिसत आहेत. कन्या सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाचे अन्य खासदार, अन्य ज्येष्ठ नेते आणि तरुण पिढी यांच्या भवितव्याचा विचार करत त्यांची पुढची दिशा काय असेल हा औत्सुक्याचा विषय आहे. एकाही महापालिकेत त्यांना दोनअंकी आकडा गाठता आलेला नाही. अजित पवारांसोबत गेले तिथे आणि काँग्रेस वा इतर कोणत्याही पक्षासोबत गेले तिथेही त्यांच्या पक्षाला दुर्बिणीतून शोधावे लागेल एवढेच यश मिळाले; काही ठिकाणी भोपळाही फोडता आला नाही किंवा दोन-चार जागा आणतानाही दमछाक झाली आहे. 

शरद पवार यांनी राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आणि असंख्य लोकांना पदे मिळवून दिली. पदे मिळवून देण्याची आज त्यांची व त्यांच्या पक्षाची क्षमता दिसत नसताना सोबत असलेल्यांना ते कोणत्या मार्गाने पुढे नेतील? पक्षाच्या फुटीतही त्यांच्याबरोबर टिकून असलेले त्यांच्याकडे काय भावना मांडतील आणि त्यावर ते काय निर्णय घेतील? हे पाहणे महत्त्वाचे असेल. महाविकास आघाडीची या निवडणुकीत आणखीच दुर्गती झाली. पुन्हा एकदा आघाडीची मोट पवार बांधतील का, तसेच इतरांची साथ मिळेल का?

कोणते मुद्दे ठरले निर्णायक?

१. काका... तुम्ही थांबणार कधी? 

२. पुतण्याची सोबत अंगलटच 

३. पक्ष आघाडीच्या महा-खाईत 

४. निष्ठावंत सोबत्यांची चिंता वाढली 

५. पुढची दिशा काय राहणार....

मुंबईतील स्वबळाची लढाई अन् आघाडी सपशेल फसली

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड हे या निवडणुकीत एका सुरात एकाच विषयावर बोलले. ते म्हणजे स्वबळावर लढायचे. त्या प्रमाणे मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली आणि आजवरच्या नीचांकी संख्येवर त्यांना समाधान मानावे लागले. उद्धवसेना-मनसे आणि काँग्रेस अशी आघाडी मुंबईत झाली असती तर आज त्यांची सत्ता आली असती. ही युती होऊ न देण्यामागे कोण होते याबद्दल दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप होतील; पण भाजप-शिंदेसेनेची सत्ता येण्यामागे स्वबळाची काँग्रेसची खुमखुमीदेखील जबाबदार होती असे विश्लेषण राजकीय विश्लेषक नक्कीच करतील.

इतर शहरांमध्ये कुठे स्वबळ, तर कुठे वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांबरोबर आघाडी असे धोरण काँग्रेसने अंगीकारले; पण त्याला लातूर वगळता कुठेही मोठे यश आले नाही. अमित देशमुख यांनी लातूर जिंकले. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांनी पक्षाला मोठे यश मिळवून देत भाजपला सत्तेच्या बाहेर केले. कोल्हापुरात महायुतीने घेरूनही सतेज पाटील यांनी खिंड लढवली पण ते सत्तेपासून दूर राहतील असेच चित्र आहे. नागपूरचा भाजपचा गड याहीवेळी काँग्रेस हलवू शकली नाही, अमरावतीतही प्रयत्न कमी पडले; भिवंडीत सत्तेत वाटा मिळू शकेल. कदाचित. मात्र, बहुतांश महापालिकांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे. दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदार; पण बहुतेक ठिकाणी मुस्लिम समाजाने एमआयएमला साथ दिल्याचे दिसते. काँग्रेसला मानणारा गैरमुस्लिम मतदार एकेक करत वेगवेगळ्या पक्षांसोबत गेला आणि आता हक्काच्या अशा मुस्लिम मतदारांना एमआयएम जवळचा वाटू लागल्याने काँग्रेससाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेत काँग्रेसला चांगले यश मिळायला हवे याचे गांभीर्य दिल्लीतील नेतृत्वाला असल्याचे कुठे जाणवले नाही.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक ? 

१. मुंबईतील स्वबळाचा बार फुसका 

२. उलट भाजपला झाला फायदा 

३. मुस्लीम मतदारांनी पाठ दाखवली 

४. दलित मतदार देखील पांगला 

५. देशमुखांनी लातूरची गढी राखली

मुंबईचे अतूट नाते राखण्यात ठाकरे ब्रँडला आले अपयश

मुंबई महापालिकेत सत्ता हे मातोश्रीचे मोठे बळ होते, ते आजच्या निकालाने राहिले नाही. ठाकरे घराणे व मुंबईचे अतूट नाते लक्षात घेता, विधानसभेतील पराभवाइतकाच किंबहुना जरा जास्तच मुंबईतील पराभव हा जिव्हारी लागणारा आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडले, पण भाऊ राज ठाकरे सोबत आले, पण त्याने विजयाचा लोलक सेनाभवनकडे झुकला नाही. महापालिकेवर पुन्हा एकदा झेंडा फडकविण्यात ठाकरे ब्रेडला अपयश आले.

२०१७ मध्ये उद्धव ठाकरेंनी मित्रपक्ष असलेल्या भाजपशी दोन हात केले आणि ८४ जागा मिळविल्या, भाजपला ८२ जागा मिळाल्या, पण शिवसेनेसाठी सत्तेची वाट मोकळी करून देत, भाजपने महापालिकेतील एकही सत्तापद आपल्याकडे घेतले नव्हते. यावेळी ठाकरे हरले असले, तरी संपलेले नक्कीच नाहीत. मात्र, दमदार वापसीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक मात्र नक्की की, भाजपच्या मदतीने आव्हान देणारे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा आपलीच मुंबईवर अधिक मजबूत पकड असल्याचे उद्धव यांनी सिद्ध केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिली. त्याचा सर्वाधिक फायदा उद्धवसेनेला झाला होता. यावेळी काँग्रेस वेगळी लढली, एमआयएमने मुस्लीम मतदारांत मोठ्या प्रमाणात स्थान मिळविले, त्याचा फटका ठाकरेंना बसला. त्यांनी काँग्रेसला सोबत घेतले असते, तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते. मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्यात त्यांनी नक्कीच यश मिळविले, पण आधीच्या निवडणुकांमध्ये हिंदी भाषकांसह गुजराती आणि अन्य भाषकही ठाकरेंच्या पाठीशी उभे राहत, तेवढे यावेळी अजिबातच उभे राहिले नाहीत, असे निकालाची आकडेवारी सांगत आहे. ठाकरेंमुळे आपण सुरक्षित आहोत, अशी भीतियुक्त भावना कालपर्यंत मुंबईकरांच्या मनात होती, ती कमी झाल्याचेही निकाल सांगत आहेत.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक? 

१. एकनाथ शिंदेपेक्षा दमदार यश पण 

२. मातोश्रीचे बळ गेले 

३. काँग्रेसला सोबत घेतले असते तर... 

४. मराठी मतांच्या ध्रुवीकरणात यश 

५. गुजराती, हिंदी भाषिकांची पाठ

शिवाजी पार्कवरील त्या सभेने वातावरण बदलले पण...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंची शिवाजी पार्कवर प्रचार सभा झाली तेव्हा राज यांनी जे दमदार भाषण केले त्याने वातावरण बदलणार असे बोलले गेले. ते एका अर्थाने नक्कीच बदलले गेले म्हणजे मराठी मतदार या दोन बंधुंभोवती एकवटण्यास त्यामुळे मोठीच मदत झाली. मराठी माणूस या मुद्याला त्यांनी अत्यंत भावनिक होत हात घातला. मराठी माणसाच्या अस्तित्त्वाची लढाई म्हणजे ही निवडणूक असल्याचे सांगून त्यांनी मोठी वातावरण निर्मिती केली होती. पण, याच भाषणाने मराठीतर मतदार भाजपभोवती एकवटला, असा निष्कर्षही आता काढला जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 'बजाव पुंगी, हटाव लुंगी' या वाक्याची आठवण राज यांनी करून देत आणि अण्णामलाईना रसमलाई म्हणत दाक्षिणात्य मतदारांना डिवचले. याशिवाय, गुजराती उद्योगपती, गुजराती समाजाचे वाढते वर्चस्व यावर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष टिप्पणी केली, भाजपची सत्ता आली तर हिंदीभाषिक महापौर बनेल, अशी भीती कृपाशंकरसिंह यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी दाखविली. त्यांच्या या वाक्यांनी आधीच भाजपसोबत असलेला हिंदी, गुजराती व दाक्षिणात्य समाज भाजपभोवती अधिक त्वेषाने एकवटला का? असे प्रश्नही आता पडू लागले आहेत.

राज यांनी भावासोबत तब्बल गेल्या २० वर्षांची कटूता संपवणारी ही निवडणूक ठरली. 'दादू'ला साथ देत महापालिकेवर भगवा झेंडा फडकवून दाखविण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. राज ठाकरे यांच्याकडे मॅग्नेट आहे. पण, नेटवर्क नाही, त्याचा फटका बसल्याचे निकालातून दिसून येते. २०१७च्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे सात नगरसेवक निवडून गेले होते, नंतर ते सगळे शिवसेनेत सामील झाले होते. त्यामुळे राज यांची महापालिकेतील पाटी कोरी झाली होती, आता त्यावर छोटा का होईना आकडा लिहिला गेला आहे एवढेच !

कोणते मुद्दे निर्णायक ठरले? 

१. भावासोबतची कटुता संपली 

२. मात्र, महापालिकेचे स्वप्न अधुरेच 

३. नेटवर्क नसल्याचाही फटका 

४. मराठी बांधव एकवटले पण... 

५. मराठीतर मतदार दुखावला का?

आक्रमक प्रभावी भाषणे करीत मुस्लीम व्होटबँक वळविण्यात यश

खा. असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएम पक्षाने महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महानगरांच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. एमआयएम कधीच चालणार नाही असे वाटत होते त्या नागपुरातही पक्षाचे नगरसेवक जिंकले आहेत. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, मुंबई या शहरांमध्ये पक्षाने उल्लेखनीय यश मिळविले. मुस्लीमबहुल भागात काँग्रेसची आजवर असलेली मक्तेदारी एमआयएमने अनेक ठिकाणी मोडीत काढली आहे. ओवेसी यांच्या आक्रमक भाषणशैलीने मुस्लीम गेल्या काही वर्षांत आकर्षित झाले असले तरी भाजपच्या विरोधात निवडून येऊ शकणारा जो पक्ष असेल त्यालाच ते मतदान करायचे. एमआयएमला मत दिले तर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होईल, असा आजवरचा समज मुस्लीम मतदारांमध्ये होता आणि त्यामुळेच ओवैसींच्या सभेला गर्दी करूनही ते मतदान काँग्रेस व इतर भाजपविरोधी पक्षांना करायचे; पण यावेळी त्यांनी मतदानासाठीही एमआयएमला पसंती दिल्याचे स्पष्टपणे दिसते.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक ? 

१. सभेची गर्दी मतात बदलली 

२. आक्रमक भाषणांचा लाभ

३. महानगरांमध्ये दमदार एंट्री 

४. काँग्रेसची मक्तेदारी मोडली 

५. मतविभाजनाने भाजपचा फायदा

वातावरण निर्माण केले तरी यश नाही मिळवता आले

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी या निवडणुकीत वातावरणनिर्मिती फार चांगली केली. रा.स्व. संघाच्या विरोधात टोकाची टीकाही केली. त्यांच्या प्रचारसभांना प्रतिसादही चांगला मिळाला; पण त्या मानाने यश मिळाले नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, चंद्रपूरसह काही महापालिकांमध्ये त्यांनी एकअंकी यश मिळविले. लातूरमध्ये त्यांनी काँग्रेसशी युती केली, पाच जागा जिंकल्या व आता तिथे कदाचित त्यांना सत्तेतही वाटा मिळेल. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यात त्यांना पाचच जागांवर समाधान मानावे लागले; पण गेल्यावेळपेक्षा दोन जागा वाढल्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन प्रवाहातील निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहून यश मिळविणारा एकमेव पक्ष अशी ओळख टिकवली. चंद्रपूरमध्ये त्यांनी उद्धवसेनेशी युती केली, तिथे दोघांनी आठ जागा जिंकल्या. मुंबईत काँग्रेसशी युती केल्याचा फायदा झाला नाही.

कोणते मुद्दे ठरले निर्णायक ?

१. सभांना गर्दी झाली; पण... 

२. मुंबईत खाते उघडले नाही 

३. अकोल्यात मोठे यश नाहीच 

४. लातूरात कदाचित सत्तेत स्थान 

५. चंद्रपुरात आठ जागा जिंकल्या 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Municipal Election Results: Key Takeaways and Analysis of Political Shifts

Web Summary : BJP triumphs in Maharashtra's municipal polls, while Thackeray faces setbacks. Shinde gains ground, Pawar struggles, and MIM makes inroads. Key factors include Fadnavis' leadership, local leaders' performance, and effective party organization. The results signal shifting political dynamics and future challenges for major parties.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा