Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:30 IST2025-08-31T11:27:45+5:302025-08-31T11:30:20+5:30
महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला.

Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
लोकमत न्यूज नेटवर्क,
मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील प्रचंड विकासकामांमुळे लोकांना दिलासा मिळत आहे. आता महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे. आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला.
शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यांची एक तास बैठक घेतली.मुंबई महापालिकेत लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व तुमच्याकडे आहे. मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकार पाठीशी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे त्यापेक्षा मजबूत नेटवर्क तुमच्याकडे असले पाहिजे, असेही शाह यांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रचारात देशभरातील नेते
शाह यांनी नेत्यांची महापालिका निवडणुकीबाबत मते जाणून घेतली. विधानसभेआधी केंद्रीय भाजपने महाराष्ट्रात विविध राज्यांमधील नेत्यांना पाठविले होते. त्यात केंद्रीय मंत्रीही होते.
मुंबईचे बहुभाषिक स्वरूप पाहता उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि दक्षिणेतील राज्यांमधील काही नेत्यांना महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत पाठविले जाईल. प्रचार यंत्रणेला ते सहकार्य करतील. आजच्या बैठकीत या संदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.
कानपिचक्याही दिल्या
साधारणत: जानेवारी २०२६ मध्ये मुंबईसह इतर महापालिकांची निवडणूक होईल, असा अंदाज आहे. जबाबदाऱ्यांचे वाटप आतापासूनच करा. मुंबई महापालिका जिंकणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. त्यावरच मुंबईतील पक्षाच्या प्रत्येक नेत्याचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल हे लक्षात ठेवा अशा कानपिचक्याही शाह यांनी दिल्याचे समजते.