Maharashtra Politics: राज्यपाल भगसिंह कोश्यारींच्या अडचणीत वाढ! हायकोर्टाने बजावली नोटीस; पण नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:12 IST2023-01-31T16:11:42+5:302023-01-31T16:12:52+5:30
Maharashtra News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असताना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.

Maharashtra Politics: राज्यपाल भगसिंह कोश्यारींच्या अडचणीत वाढ! हायकोर्टाने बजावली नोटीस; पण नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याचे राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती देण्यात आली. यावरुन राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठांच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदांमध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या आधीच वादात सापडल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नवीन नियुक्तीवरून वादात सापडले आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर खंडपीठाने दोन आठवड्यांत मागितले उत्तर
कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा दावा करत माजी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवरील युक्तिवाद झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपालांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
दरम्यान, राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"