मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहित पवारांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे. यानंतर न्यायालयानं रोहित यांना समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना १३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 'निवडणुकीच्या काळात रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचाऱ्यांच्या वापर करुन पैशांचं वाटप केलं. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना आपण त्यावेळीच रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं,' असं राम शिंदेंनी याचिकेत नमूद केलं होतं.व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील याचिकेतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. या प्रकरणात न्यायालयानं रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १३ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर याचिकेवर सुनावणीदेखील होऊ शकते. त्यामुळे रोहित पवार अडचणीत सापडले आहेत.
रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:00 IST