Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:38 IST2025-06-18T09:37:53+5:302025-06-18T09:38:47+5:30
Purushottam Chavan News: राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली

Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. त्यांना ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यातही प्रोडक्शन वॉरंट मिळाले असून बुधवारी त्यांचा ताबा घेत पुढील तपास करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात २६३ कोटींच्या टीडीएस घोटाळ्यातही ईडीने चव्हाण यांना अटक केली होती. फेब्रुवारीत चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील शासकीय कोट्यातील घरे सवलतींत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत २० जणांची २४ कोटी ७८ लाख रुपयांना फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वी अटक केली होती. दाखल गुन्ह्यात करंदीकर यांचाही जबाब नोंदविण्यात आला. तपासात, करंदीकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात दोन कोटी ६४ लाख रुपये आढळले. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले, मात्र त्यात तोटा झाला. या बँक खात्यातील रकमेबाबतची माहिती मुख्यालयाला सादर केली होती. याबाबतही आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस महासंचालक कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. हे बँक खाते देखील चव्हाण ऑपरेट करत असल्याचे समजते आहे.
आज ताबा घेणार
सुरतच्या एका व्यावसायिकाला शासनाच्या अधिपत्याखालील भूखंड स्वस्तात देतो, असे सांगत ७.४२ कोटी उकळले. तसेच चव्हाण यांनी पोलिसांच्या नाशिक प्रशिक्षण अकादमीतील प्रशिक्षणार्थीसाठी टी-शर्टचे कंत्राट मिळवून देण्याचेही प्रलोभन त्याला दाखवले होते. व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, चव्हाणविरोधात दुसरा फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पहिल्या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या चव्हाण यांना दुसऱ्या गुन्ह्यातही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ६ जणांची ७.४२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल दुसऱ्या गुन्ह्यात चव्हाण यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्यात आले आहे. बुधवारी त्यांचा ताबा घेण्यात येणार आहे.