मुंबईतीलचेंबूर परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. स्विमिंग पूलमध्ये पोहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अजित अनिकेनी (वय, ५२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते देवनार येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अजित चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूलमध्ये येथे पोहायला गेले. त्यांनी पहिली ५० मीटरची फेरी पूर्ण केली आणि विश्रांती घेण्यासाठी काठावर बसले. परंतु, बराच वेळ झाला तरी अजित पाण्यातून बाहेर न आल्याने जीवरक्षकाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी ते पाण्यात बुडाल्याचे निर्दशनास आले. यानंतर अजित यांना पाण्याबाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजित यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला, असे वैद्यकीय अहवालातून समोर आले.
नागपूर: वाढदिवसाची पार्टी करताना स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यूनागपूरच्या वाठोडा परिसरातील एका फार्महाऊसमध्ये वाढदिवस साजरा करताना २२ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. मयत पांढुर्णा गावातील एका फार्महाऊसमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. पोहता येत नसतानाही त्याने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्यानंतर तो पाण्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करू लागला. सुरुवातीला मित्रांना वाटले की, तो मस्करी करत आहे. मात्र, तो खरंच पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती वाठोडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.