MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:03 IST2025-09-26T17:01:55+5:302025-09-26T17:03:02+5:30
MPSC Prelims Exam 2025 Postponed: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे.

MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
MPSC Exam Postponed Date 2025: राज्यातील काही भागांत पावसाने विध्वंस घडवला. अनेक ठिकाणी गावांना पुराने वेढा दिला. अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक तरुण परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. तशी शिफारस राज्य सरकारने केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. आता नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. याची दखल घेत राज्य सरकारने तशी शिफारस आयोगाला केली.
एमपीएससी परीक्षा, मुख्यमंत्री काय म्हणाले?
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती."
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या तारखेची केली घोषणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ -दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. pic.twitter.com/1nF9x7ja7P
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 26, 2025
सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.