“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:30 IST2025-06-28T17:30:44+5:302025-06-28T17:30:44+5:30
Vishal Patil News: काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे. तुरुंगात जावे लागले तरी चालेल. पण माझे विचारविश्व काँग्रेसचे आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
Vishal Patil News:काँग्रेसचा विचार एवढा खोल आहे की, तो कोणीही सहजपणे संपवू शकत नाही. म्हणूनच अपक्ष असलो तरी काँग्रेस विचारांवर चालणारा एकमेव खासदार म्हणून मी निवडून आलो आहे. अडचणी येतील, तुरुंगातही जावs लागेल, तरी आमच्यासारखे आणखी दहा-वीस जण तयार होतील. काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे, असे सांगताना खासदार विशाल पाटील यांनी भाजपावर टीका केली.
एका कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील म्हणाले की, भाजपाने आमच्याच घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या वहिनींना पक्षात घेऊन भाजपाने आपली रणनीती स्पष्ट केली. मी अपक्ष निवडून आलो असलो, तरी लोकांना सांगितले की माझे विचारविश्व काँग्रेसचे आहे, म्हणूनच जनता माझ्या पाठीशी उभी राहिली, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. आमचे काय व्हायचे ते होऊ दे, तुरुंगात जावे लागले तरी चालेल, पण काँग्रेस सोडायची आमची तयारी नाही, असे विशाल पाटील यांनी ठणकावून सांगितले.
कितीही पक्षांतरे होवोत, काँग्रेस संपणार नाही
काँग्रेस पक्षाची ताकद ही विचारात आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी ही विचारधारा कधीही संपणार नाही. पक्ष अडचणीत असताना पक्षातून कोणी बाहेर पडला तरी पक्ष संपत नसतो, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फुट पाडली, त्यांना याचा भविष्यात पश्चाताप तर होणारच, असा दावा विशाल पाटील यांनी केला.
दरम्यान, भाजपला वसंतदादा घराणे फोडायचे होते. त्यासाठी आधी मला ऑफर देण्यात आल्या. पण मी गळाला लागत नाही, म्हणून आमच्या वहिणी फोडल्या. आमचे घर फोडले. पण मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो, तरी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे काँग्रेसचे विचार असे सहजासहजी दाबता येत नाहीत, असे विशाल पाटील म्हणाले.