मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:52 IST2025-03-04T12:24:03+5:302025-03-04T12:52:03+5:30

धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर हा राजीनामा दिला हे सरकारने सांगावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

MP Supriya Sule has said that the government should explain on what basis Dhananjay Munde resigned | मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..."

मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..."

Supriya Sule on Dhananjay Munde Resign: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. मात्र आता या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे. धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर हा राजीनामा दिला हे सरकारने सांगावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदार आग्रही होती. संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि मंगळवारी मुंडेंनी राजीनामा दिला. आजारी असल्याचे कारण देत मुंडेंनी राजीनामा दिल्याचे सांगितले. मात्र सुप्रिया सुळे यांनी यावरुनच सरकारला सवाल विचारला आहे.

"धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना कौटुंबिक हिंसाचार पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार याचा कशाचाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्यांच्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला आणि सरकारला मला विनम्रपणे विचारायचं आहे की अजित पवार आणि छगन भुजबळ हे म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे मला स्पष्टीकरण हवय की हा राजीनामा नैतिकतेवर दिला आहे की का स्वतःच्या तब्येतीमुळे दिला आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"हे सर्व भयानक आहे. आज ८४ दिवस झाले आहेत या गोष्टीला. या प्रकरणातल्या चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे सर्व फोटो आधीच पाहिलेले असतील ना. फोटो पाहून या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस लागले," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यात काय म्हटलं?

"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं धनंजय मुंडेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

"धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Web Title: MP Supriya Sule has said that the government should explain on what basis Dhananjay Munde resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.