खासदार सुनील तटकरेंवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी आणखी एक भाकरी फिरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 19:59 IST2023-06-12T19:58:16+5:302023-06-12T19:59:01+5:30
पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती

खासदार सुनील तटकरेंवर मोठी जबाबदारी; शरद पवारांनी आणखी एक भाकरी फिरवली
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले विधान चर्चेत आहे. त्यात शरद पवारांनी १० जूनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांनाही राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांचे प्रभारीपद सोपवले. आता खासदार सुनील तटकरे यांनाही पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
खासदार सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे. याबाबतचे पत्र काढून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे.
पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती आणि आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देऊन सुनिल तटकरे यांच्या कामाला शरद पवारांनी पोचपावती दिली आहे.
सत्ताधाऱ्यांचा राष्ट्रवादीवर निशाणा
'शरद पवारांनी भाकरी फिरवली, असे म्हणतात. पण, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरविणे नाही, तर ही धुळफेक करणे म्हणतात. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे' अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे.
मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही - अजित पवार
शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. परंतु त्यावर अजित पवार म्हणाले की, मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही, राज्य पातळीवर काम करणारा आहे. माझ्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. अलीकडे मिडिया माझ्या इतकं का प्रेमात पडलाय कळत नाही, मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय. मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही असं त्यांनी स्पष्ट केले.