भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 06:01 PM2020-08-09T18:01:39+5:302020-08-09T18:03:19+5:30

इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं.

MP Sambhajiraje Mission to Save Fort historic Vijaydurg fort in Devgad wall of the collapsed | भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोयविजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधिकरणच्या अंतर्गत दिला तर ८०% किल्ला 'पुनर्बांधणी करता येईलसांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेवू

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पण सध्या महाराजांच्या किल्ल्यांची होत असलेली दुरावस्था पाहून अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी किल्ले विजयदुर्गची तिहेरी तटबंदीपैकी एक बुरुज समुद्राच्या पाण्याने ढासळत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत संभाजीराजेंनी किल्ल्याची पाहणी केली आहे. ते म्हणाले की, मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. काल पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळेच माहात्म्य आणि सौंदर्य असते, तसे विजयदुर्गाचेसुद्धा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. विजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधिकरणच्या अंतर्गत दिला तर जवळपास ८०% किल्ला 'पुनर्बांधणी' करून घेता येईल. "पुनर्बांधणी" हा शब्द मी जाणीवपूर्वक घेतला, कारण हा असा एकमेव समुद्री किल्ला आहे, ज्याच्या जुन्या पद्धतीच्या बांधकाम शैलीतील इमारती बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत. त्यावर तज्ज्ञांची थोडी जरी मदत घेतली तरी आपण खूप मोठं कार्य करू शकतो. आम्हाला रायगडवरती काम करत असताना पुनर्बांधणी करण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत. कारण, इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार असो की केंद्र सरकार असो, केवळ मुंबई-दिल्लीत वातानुकुलीत कार्यालयांत बसून, कधीतरी पत्र लिहून, भाषण करून किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. त्याकरिता किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन, बारकाईने अभ्यास करूनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेवू असा टोला खासदार संभाजीराजे यांनी राजकीय नेत्यांना लगावला आहे.

Web Title: MP Sambhajiraje Mission to Save Fort historic Vijaydurg fort in Devgad wall of the collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.