"माझ्या इतिहासावर बोलण्याआधी पवार साहेबांकडून..."; प्रफुल्ल पटेलांचे राऊतांना एका वाक्यात प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:54 IST2025-04-04T13:48:20+5:302025-04-04T13:54:21+5:30
Praful Patel on Sanjay Raut: लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा ...

"माझ्या इतिहासावर बोलण्याआधी पवार साहेबांकडून..."; प्रफुल्ल पटेलांचे राऊतांना एका वाक्यात प्रत्युत्तर
Praful Patel on Sanjay Raut: लोकसभेनंतर राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. गुरुवारी राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोमणा मारला. संजय राऊतांनी रंग बदलू नये असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे अशी टीका राऊतांनी केली. इतिहास काढला तर प्रफुल्ल पटेलांना महाराष्ट्र सोडून जायला लागेल असंही संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या टीकेला प्रफुल्ल पटेल यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात राज्यसभेत जुगलबंदी रंगली होती. शिवसेनेने भूमिका बदलली हे सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकरांशी बोलताना पटेलांवर निशाणा साधला. दाऊदच्या हस्तकांशी संबंध असल्याचे आरोप प्रफुल्ल पटेलांवर झाले आहेत. प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधासह भाजपसोबत गेले आहेत. आता ते इतरांना निष्ठेच्या गोष्टी सांगणार का अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक्स पोस्टवरुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. "माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं.@rautsanjay61
— Praful Patel (@praful_patel) April 4, 2025
काय म्हणाले संजय राऊत?
"आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुमचा रंग कोणता आहे. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. आणि तुम्ही वक्फवर बोलतात. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नका. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. अशा घाण दळभद्र्याच्या तोंडाला लागणं हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. त्यांचा इतिहास काढायला लागलो सर्व तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल. ही लोकं फडणवीस यांच्या बाजूला जाऊन बसणार. हे लोक महाराष्ट्राचं नेतृत्व संसदेत करतात. भाजपही या लोकांना खांद्यावर घेऊन बसतात," असं संजय राऊत यांनी म्हटलं.