Maharashtra CM: 'गुड न्यूज' सोबत घेऊनच फिरतो; उद्धव ठाकरेंचे हजरजबाबी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:01 IST2019-11-29T18:00:29+5:302019-11-29T18:01:51+5:30
Maharashtra CM: बहुमत चाचणीच्या गुडन्यूज संदर्भात उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव म्हणाले, मी गुड न्यूज सोबत घेऊन फिरतो. अर्थात त्यांचा टोला भाजपला असला तरी गुड न्यूज म्हणजे आदित्य ठाकरे हेच होते. त्यांच्या या उत्तरामुळे एकच हशा पिकला होता.

Maharashtra CM: 'गुड न्यूज' सोबत घेऊनच फिरतो; उद्धव ठाकरेंचे हजरजबाबी उत्तर
मुंबई - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अनेक दिवस चालला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निर्णायक भूमिकेमुळे अखेर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री विराजमान झाले आहेत. मात्र त्याआधी भाजपने सत्तास्थापनेसाठी केलेले प्रयत्न चांगलेच लक्षवेधी ठरले. त्यापैकीच माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुठल्याही क्षणी 'गुड न्यूज' येईल, हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजरजबाबी उत्तर देत भाजपला टोला लगावला.
मुंबई प्रेसक्लब येथे उद्धव ठाकरे यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव यांच्यावर प्रेस क्लबच्या वतीने प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. उद्धव यांनी या कार्यक्रमात आधीच्या फडणवीस सरकारवर टीका केलीच. तसेच सरकारस्थापनेच्या घडामोडीतील गुड न्यूज या वक्तवाचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला पुत्र आदित्य ठाकरे यांना सोबत घेऊन आले होते. सरकार स्थापन झाल्यापासून आदित्य ठाकरे वडिलांसोबतच दिसून येत आहेत. यावेळी बहुमत चाचणीच्या गुडन्यूज संदर्भात उद्धव यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव म्हणाले, मी गुड न्यूज सोबत घेऊन फिरतो. अर्थात त्यांचा टोला भाजपला असला तरी गुड न्यूज म्हणजे आदित्य ठाकरे हेच होते. त्यांच्या या उत्तरामुळे एकच हशा पिकला होता.
सुधीर मुनगंटीवार यांच्या गुड न्यूजच्या वक्तव्याने सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला होता. बाळ जन्माला येणार असेल की, आपल्याकडे गुड न्यूज हा शब्द वापरण्यात येतो. तोच धागा पकड उद्धव यांनी आदित्य यांच्या हजेरीवर कटाक्ष करत, गुड न्यूज सोबत घेऊन फिरत असल्याचे म्हटले.